शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘शिवसृष्टीत’ मिळणार विशेष सवलत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे उभारलेली शिवसृष्टी पाहण्यासाठी येणारे शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत तीन मे ते सहा जून, म्हणजेच शिवसाम्राज्य दिनापर्यंत असेल, अशी माहिती ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी मंगळवारी दिली.

फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुल्या झालेल्या शिवसृष्टीला नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत. येत्या काळात यामध्ये वाढ होण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या विशेष सवलतीची माहिती कदम यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर उपस्थित होते.

यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त पुढील वर्षभर प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना त्यांना ही विशेष सवलत देण्यात येणार आहे.

या अंतर्गत सहा जूनपर्यंत शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांकडून १२० रुपयांऐवजी ८० रुपये आणि पालकांकडून ३५० रुपयांऐवजी २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबरोबरच एका वेळी १० जणांच्या समूहाने नोंदणी केल्यास त्यांना प्रत्येकी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

‘जून २०२४पर्यंत दुसऱ्या चरणाचे लोकार्पण’

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे, अर्थात ‘सरकारवाडा’चे लोकार्पण झाले. आता दुसऱ्या चरणाचे काम सुरू आहे. पुढील वर्षी सहा जून २०२४ रोजी दुसऱ्या चरणाचे लोकार्पण होणार आहे,’ असे जगदीश कदम यांनी सांगितले.

प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

शिवसाम्राज्य दिनाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्यात्यांच्या अभ्यासवर्गाचे नियोजन आहे. यासह आगामी काळात ‘पुणे दर्शन’मध्ये शिवसृष्टीचा समावेश करण्याची बाब विचाराधीन असून, याची प्रक्रिया सुरू असल्याचे जगदीश कदम यांनी नमूद केले.

Source link

Career Newseducation newsGood newsMaharashtra Timesschool studentsShiv Srishtispecial discountआनंदाची बातमीविशेष सवलतशालेय विद्यार्थीशिवसृष्टी
Comments (0)
Add Comment