‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना ताकदीने उतरणार असून, त्यासाठी २५ कॉलेजांमध्ये नव्याने युनिट सुरू केले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कार्यकारिणीची नव्याने रचना करण्यात येईल,’ अशी माहिती युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे वसतिगृह, परीक्षा, शुल्क, विस्कळित शैक्षणिक वर्ष अशा विविध प्रश्नांवर सरदेसाई यांनी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सरदेसाई यांनी या वेळी दिली.
सरदेसाई म्हणाले, ‘युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीकडून पुणे विद्यापीठाच्या प्रश्नांकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कोणत्याही प्रकारच दुर्लक्ष होणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहरातील २५ कॉलेजांमध्ये नव्याने युनिट स्थापन करण्यात आले आहे. या युनिटला विद्यार्थी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आमचे उमेदवार बाकेराव बस्ते निवडून आले आहेत. त्यांच्याकडूनही विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्न मांडण्यात येतील. पुढच्या सिनेटमध्ये आमचे अधिक सदस्य दिसतील,’ अशी ग्वाही सरदेसाई यांनी दिली. सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या वेळी कुलदीप आंबेकर उपस्थित होते.
‘मंत्री राजकीय विधाने करण्यात व्यस्त’
‘राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष विस्कळित झाले असताना, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजकीय विधाने करण्यात व्यस्त आहेत. त्यांना थोडेसे आपल्या विभागाच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका सर्वप्रथम युवासेनेने मांडल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबात प्रश्न सुटले. यापुढेही युवासेना परीक्षा वेळेत होऊन, शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे,’ असे सरदेसाई यांनी सांगितले.