हायलाइट्स:
- मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
- खासगी कार्यालये, विवाह सोहळे याबाबतच्या नव्या नियमांविषयी आरोग्यमंत्र्यांकडून माहिती
- थिएटर आणि धार्मिक स्थळे बंदच राहणार असल्याचं केलं स्पष्ट
मुंबई : सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी खासगी कार्यालये, विवाह सोहळे आणि इतर गोष्टींबाबत नेमकी काय शिथीलता देण्यात आली आहे, याविषयी माहिती दिली आहे.
‘मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाकडून निर्बंध शिथील करण्याबाबत प्रस्ताव गेला होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे,’ असं राजेश टोपे म्हणाले.
विवाह सोहळ्यासाठी काय असणार नवे नियम?
करोना संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यातील उपस्थितीबाबत राज्य सरकारकडून निर्बंध लादण्यात आले होते. यामध्ये शिथीलता आणत आता मोकळ्या जागेतील विवाह सोहळ्यात २०० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच कार्यालयातील विवाह सोहळ्यात एकूण क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेसह नागरिकांना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे.
खासगी कार्यालयांसाठी काय असतील नियम?
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठराविक वेळेत कार्यालय सुरू ठेवून गर्दी होण्यापेक्षा आता २४ तास कार्यालय सुरू ठेवून कर्मचाऱ्यांना शिफ्टमध्ये काम करता येणार आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळेत वाढ
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळा दुपारी ४ पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता यामध्ये बदल करत रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनी करोना लशीचे दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली असली तरी थिएटर आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.