माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात दहावी, बारावी निकालासाठीची लगबग सुरू आहे. विभागातील दहावी, बारावीच्या २५ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता तपासणीनंतर मूल्यांकनातील चुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
दहावी, बारावी परीक्षेनंतर विद्यार्थी, पालकांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत. मात्र, नियमित वेळेत निकाल जाहीर होईल, यासाठी मंडळाकडून निकालाची लगबग सुरू आहे. उत्तरपत्रिका तपासणीनंतरची प्रक्रिया विभागीय पातळीवरील कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे. मूल्यांकनातील चुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची फेर पडताळणी केली जाते.
छत्रपती संभाजीनगर विभागात सुमारे तीन लाख विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या एकूण २५ लाख उत्तरपत्रिका तपासणीनंतर नियामकांनी मंडळाकडे जमा केल्या आहेत. विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो.
पाच जिल्ह्यांत २ हजार ६१४ शाळांमधील दहावीच्या परीक्षेला १ लाख ६२ हजार आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे १ लाख २७ हजार विद्यार्थी बसले होते. १ हजार ३६० उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.
विभागातील उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. उत्तरपत्रिका तपासणी काही चुका झालेल्या असू शकतात. अशा चुका तशाच राहू नयेत, म्हणून उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे. काही दिवसात हे कामही पूर्ण होईल, असे विभागीय सचिव विजय जोशी यांनी सांगितले.
तपासणीनंतरची प्रक्रिया
यंदा तपासणीवर सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकला. उत्तरपत्रिका मूल्यांकना प्रक्रियेचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याने निकाल लांबणार असे अंदाज बांधले जात होते. परंतु तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निकाल वेळेत जाहीर होण्याची शक्यता आहे. विभागात दहावीच्या १५ लाख ८८ हजार आणि बारावीच्या ९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका तपासणींकांनी तपासणी करून मंडळाकडे जमा केल्या आहेत. असे असले तरी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात काही चुका झालेल्या असू शकतात. त्यामुळे या चुका टाळण्यासाठी उत्तरपत्रकांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी मंडळ कार्यालयात लगबग सुरु आहे. काही दिवसात ही पडताळणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष निकालपत्र तयार करण्यासाठी आवश्यक डाटा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया होते.