मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत चुकीचा पेपर कोड असलेली प्रश्नपत्रिका वितरित केल्याचा प्रकार समोर आला आहे. चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर कोड असलेल्या प्रश्नपत्रिकेचे वाटप करण्यात आले. मात्र काही वेळाने हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या.
विद्यापीठाकडून विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची आणि विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्राची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली. दोन्ही विद्यार्थ्यांची एकाच विषयाची परीक्षा होती. सहाव्या सत्राच्या परीक्षेसाठी काही विद्यार्थ्यांना शासकीय विधी महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आले होते. या विद्यार्थ्यांचा ‘अल्टरनेट डिस्पूट रिझॉलुशन सिस्टीम’ या विषयाचा पेपर होता.
प्रवेशपत्रावर या विषयाचा कोड ३५६११ असा नमूद केला होता. मात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नपत्रिकेवर ३५६०३ असा पेपर कोड होता. ‘विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवरील विषयाचा पेपर कोड उत्तरपत्रिकेवर नमूद केला. मात्र काही वेळाने हा पेपर कोड चुकीचा असल्याचे समोर आले. मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दोन ते तीन प्रश्नांची उत्तरे सोडविली होती’, अशी माहिती विद्यार्थी किरण मर्चंडे याने दिली.
‘सुमारे २० ते २५ मिनिटांनी विद्यार्थ्यांना दुसरी उत्तरपत्रिका देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या नवीन उत्तरपत्रिकेवर प्रवेशपत्रावरील पेपर कोड नमूद केला. मात्र या गोंधळात जवळपास २५ मिनिटांचा वेळ उलटून गेला होता’, असेही मर्चंडे याने नमूद केले. यामध्ये विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्याने हा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.
त्यातून ऐन परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. ‘विद्यापीठ आणि कॉलेजच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने या घटनेची चौकशी करून संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी युवा सेनेचे अॅड. संतोष धोत्रे यांनी केली.
विद्यापीठाचे कॉलेजकडे बोट
याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता, ‘विद्यापीठ संबंधित कॉलेजला पाच वर्षे आणि तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या अशा दोन्ही प्रश्नपत्रिका पाठविते. दोघांची प्रश्नपत्रिका सारखी असते. संबंधित कॉलेजने चुकीने दुसऱ्या पेपरचे वाटप विद्यार्थ्यांना केले असेल. ही विद्यापीठाची कुठलीही चूक नाही’, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.