याबाबत प्राथमिक चौकशी केली असता या निकालात काही त्रुटी असल्याचे जाणवले. या निकालातील कोणत्या त्रुटी आहेत याची शहानिशा करण्यासाठी विद्यापीठाने आज विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवराम गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यानुसार निकालातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांना मिळालेले जास्त गुण किंवा मिळालेले कमी गुण याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. या समितीला तत्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
काय घडली घटना?
रहेजा कॉलेजमध्ये मानसशास्त्र हा अभ्यासक्रम शिकणारे ३२ विद्यार्थी आहे. त्यातील काहींना साठे कॉलेज आणि रिझवी कॉलेज ही दोन परीक्षा केंद्रे आली होते. ही दोन परीक्षा केंद्रे मिळालेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचा ‘अॅबनॉर्मल सायकॉलॉजी’ विषयाचा पेपर दिला होता. विद्यापीठाने ३२ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांना या एकाच विषयात नापास केले.
सात विद्यार्थ्यांना एकाच विषयात १०० गुण दिले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना ‘अॅबनॉर्मल सायकॉलॉजी विषयात नापास करण्यात आले, त्यांना २६, २५, २४, १५, १६, १७, १८ आणि १७, १६, १५, १४, १३ असे एका क्रमाने गुण देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्य सर्व विषयांत ६५पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अन्य विषयांत चांगले गुण मिळाले असताना एकाच विषयात नापास कसे, असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.