घरात अचानाक घुसले ५-६ दरोडेखोर; शेतशिवारात घडलेल्या घटनेनं खळबळ

हायलाइट्स:

  • देगाव येथील शेत शिवारात सशस्त्र दरोडा
  • एकूण २ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी केला लंपास
  • घटनेनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचं वातावरण

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव येथील शेत शिवारात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या परिसरातील दोन घरातून दरोडेखोरांनी २ लाख ७८ हजार तीनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

देगाव येथील सुदर्शन ज्ञानबा लेंभाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, देगाव शेत शिवारातील दत्त मंदिराच्या जवळील घरात आम्ही राहतो आणि माझे वडील या मंदिराचे पुजारी आहेत. आम्ही सर्व लोक जेवण करत असताना अचानक आमच्या घरात सहा लोक हे एका पाठोपाठ आले. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता आणि त्यांच्या हातात चाकू, रॉड, काठ्या होत्या. त्या लोकांनी माझ्या वडिलांना मारल्यामुळे आम्ही घाबरून गेलो. त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण केली. त्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे ते घेऊन जा, मात्र मारहाण करु नका, अशी आम्ही विनंती केली.

मोबाईल चार्जरवरील रक्त आरोपींपर्यंत घेऊन गेलं; महिलेच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा!

घरातील पैसे व सोने आम्हाला द्या, अशी मागणी त्यांनी केली. घरात आलेल्या दोन जणांनी माझ्या आईच्या हातात असणाऱ्या चांदीच्या पाटल्या हातातून काढून घेतल्या. तसंच गळ्यातील साधी पोत, एकदाणी व एक पिवळ्या मण्याची पोतही ओढून घेतली. या घटनेत एकूण २ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरांनी नेला, अशी माहिती लेंभाडे कुटुंबाने दिली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, पोलीस उपविभागीय अधिकारी खेडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार एसएम जाधव हे करत आहे.

Source link

washimwashim newsदरोडा प्रकरणवाशिमवाशिम पोलीस
Comments (0)
Add Comment