मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) १६ मेपासून जाहीर केलेली पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एमएमएस) परीक्षा पुढे ढकलली आहे. आयडॉलने ऐनवेळी ही परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली होती.
आयडॉलच्या एमएमएस अभ्यासक्रमासाठी सुमारे ९३ विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी नोकरी करतात. त्यामुळे प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना एक महिना आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र विद्यापीठाने १५ दिवसांआधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.
तसेच परीक्षेसाठी काही विषयांची पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यातून १५ दिवसांमध्ये तयारी करणे शक्य नाही, असेही विद्यार्थ्याने नमूद केले. याबाबत युवा सेनेचे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान एमएमएस सत्र १च्या परीक्षेसाठी एकूण आठ विषय आहेत. त्यापैकी ६ विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत. तर दोन विषयांचे अध्ययन साहित्य ऑनलाइन सॉफ्ट कॉपी स्वरूपात उपलब्ध आहे. ही दोन पुस्तके छपाईसाठी पाठविली आहेत. ते लवकरच उपलब्ध होईल. तसेच परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.