महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीला तसेच पदरचनेला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे महाविद्यालयात सध्या नियमित पदांवर भरती करण्यात आलेल्या उमेदवारांचा नोकरीत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने एकूण ५३५ पदांना मान्यता दिली आहे.
महाविद्यालय सुरू करताना महापालिकेने आधीच काही पदे भरलेली असून शासनाच्या आदेशानुसार, २७ एप्रिलपासून ही सर्व पदे कायम झाली आहेत. तर महापालिकेचा उर्वरित पदे भरण्याचा मार्गही मोकळा झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. सध्या महाविद्यालयात पहिल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या तुकड्या शिक्षण घेत आहेत.
पहिल्या वर्षात १०० तर दुसऱ्या वर्षात १०० विद्यार्थी शिकत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.
मात्र, महाविद्यालय सुरू करायचे असल्याने महापालिकेने काही पदांची भरतीही केलेली होती. त्याला सरकारकडून अद्याप मान्यता मिळालेली नव्हती. मात्र, शासनाने आता मान्यता दिल्याने भरण्यात आलेली पदे कायम झाली असून महापालिका पुढील तीन वर्षात आणखी पदे भरू शकणार आहे, असे बिनवडे यांनी सांगितले.
आवश्यकतेनुसार भरती
महाविद्यालय ट्रस्टने पाठवलेल्या सेवा प्रवेश नियमावली व पदरचनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ५३५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी २०२ पदे नियमित स्वरूपाची; तर ३३३ पदे बाह्य किंवा कंत्राटी स्वरूपाची आहेत. सध्या महाविद्यालयात पहिल्या दोन वर्षांचे विद्यार्थी शिकत आहेत. पुढील वर्षी तिसऱ्या वर्षाची तुकडी दाखल होणार असल्याने या पदांना मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यानुसार पुढील भरतीप्रक्रिया राबवता येईल, असे महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. अरूण बंगिनवार यांनी सांगितले.