स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जात असून लवकरच पुण्यात पहिले केंद्र सुरू करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
समाजकल्याण विभाग आणि बार्टीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी खासगी संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, या शासकीय अनुदान लाटण्यासाठी गैरप्रकार होत असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकालदेखील कमी प्रमाणात येत होते. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये परीक्षा केंद्र संचालित केले जाईल. बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली. बार्टीमार्फत अनुदान तत्त्वावर खासगी संस्थेकडून स्पर्धा परीक्षा केंद्रे चालविली जायची.
भरीव शासकीय अनुदान असतानादेखील या संस्था गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात अपयशी ठरल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्रांचा उत्तम दर्जा राखला जावा, यासाठी स्वतंत्र परीक्षा केंद्रे सुरू केली जातील, असे भांगे यांनी सांगितले. बार्टीच्या बैठकीला समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश इंगळे आदी उपस्थित होते.
दिल्लीतील प्रशिक्षण संस्थांशी करार
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी विभागाच्यावतीने दिल्लीतील नामवंत प्रशिक्षण संस्थांशी करार करण्यात येणार आहे.
याशिवाय, जगभरातील विषयतज्ज्ञ, परदेशातील विद्यापीठे यांच्याशीदेखील करार केला जाईल. ऑनलाइन पद्धतीने परदेशातील व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.