Uddhav Thackeray: राज्यासाठी लॉकडाऊनचा निकष ठरला!; CM ठाकरे यांचा मोठा निर्णय

हायलाइट्स:

  • दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास लॉकडाऊन.
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत जाहीर केला निकष.
  • मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे ही त्रिसूत्री पाळणे आवश्यक.

मुंबई: ‘कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे’, असा महत्त्वाचा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड निर्बंध शिथील करत असताना राज्यातील जनतेला दिला आहे. निर्बंधांत शिथीलता दिली जात असली तरी आता जबाबदारी मात्र वाढली आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे ही त्रिसूत्री सर्वांनीच पाळणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. ( Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown )

वाचा: राज्यात १५ ऑगस्टपासून सर्वात मोठा ‘अनलॉक’; अशा आहेत गाइडलाइन्स

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ब्रेक द चेन अंतर्गत नवा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथील करताना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. ‘आपण निर्बंध शिथील केले असेल आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजन तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे निर्माण झालेली भीषण स्थिती आपण सर्वांनीच पाहिली आहे. म्हणूनच यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा: मोठी बातमी: राज्यातील ‘हा’ जिल्हा करोनामुक्त; आता एकही रुग्ण नाही!

राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असेल तर त्यावेळी लगेच निर्णय घेत राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती. त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. त्यामुळेच दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की ( सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. गेल्या पावणे दोन वर्षांत कोविड महामारीने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो आहोत आणि मला खात्री आहे की, शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

वाचा: राज्यात हॉटेल्स आता रात्री १० वाजेपर्यंत; सरकारने घेतला मोठा निर्णय

‘निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. कोविडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये तसेच अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. अशा परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. परवा आपण मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत. इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथील करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ’, असे नमूद करत कोविड नियम पाळण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला.

वाचा:राज्यात डेल्टा प्लसचे आज २० नवे रुग्ण; मुंबईसाठी धोक्याची घंटा

Source link

criteria for lockdown in maharashtramaharashtra lockdown latest newsuddhav thackeray on covid restrictionsuddhav thackeray on lockdownuddhav thackeray on maharashtra lockdownउद्धव ठाकरेकोविडकोविड निर्बंधब्रेक द चेनलॉकडाऊन
Comments (0)
Add Comment