राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव राहण्याची भीती आहे. ज्या विद्यार्थ्यांचे समकक्षता प्रमाणपत्र मंडळाला मिळालेले नाही, त्यांचा निकाल राखीव ठेवणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत देण्यात आली.
नाशिक विभागातील अशा चौदा विद्यार्थ्यांची नावे राज्य मंडळाने जाहीर केली असून, ही संख्या यापेक्षा जास्त असण्याचीही शक्यता आहे. परराज्यांतून राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिल्यानंतर राज्य मंडळांतर्गत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समकक्षता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेशी समकक्ष असणाऱ्या परीक्षा दिल्याचे हे प्रमाणपत्र अकरावीला प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांनी सादर करण्याचा नियम आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा झाली, तरी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे हे प्रमाणपत्र जमा केलेले नाही. विद्यार्थ्यांकडून हे प्रमाणपत्र घेण्याची सूचना मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना केली होती. परंतु, बारावीचा निकाल तोंडावर आला, तरी अनेक विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे अद्यापही मंडळाला मिळालेली नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत तातडीने समकक्षता प्रमाणपत्र मंडळाकडे जमा करावे लागणार आहे.
प्रमाणपत्र मुदतीत देणे अनिवार्य
अकरावीमध्ये प्रवेश घेतानाच समकक्ष प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना विद्यार्थ्याला दिली जाते. त्याशिवाय बारावीच्या परीक्षेला बसू न देण्याचा नियम आहे. परंतु, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाते. मात्र, तरीही अनेक विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करीत नाहीत. निकाल जाहीर झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली जाते. मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर न झाल्यास या विद्यार्थ्यांचा निकाल रद्द केला जातो.
विद्यार्थ्यांकडून समकक्षता प्रमाणपत्र घेऊन ते मंडळाकडे जमा करणे ही कनिष्ठ महाविद्यालयांची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सातत्याने यासाठी मुदत दिली जाते. परंतु, मुदतीत प्रमाणपत्र न मिळाल्यास निकाल रोखावा लागतो. त्यामुळे ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत, त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून अशी समकक्षता प्रमाणपत्रे मिळवावीत.
-नितीन उपासनी, अध्यक्ष, नाशिक विभागीय राज्य मंडळ