SPPU: ‘जागतिक स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे नाव टिकवा’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव टिकवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असा सूर विद्यापीठ सल्लागार परिषदेच्या पहिल्या सभेत उमटला. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम आखणे आदी मुद्द्यांवरही या सभेत चर्चा झाली.

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ सल्लागार परिषदेची बैठक विद्यापीठात झाली. विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार उद्योगपती संजय किर्लोस्कर परिषदेचे अध्यक्ष असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ राज शेखर जोशी आदी परिषदेचे सदस्य आहेत. जागतिक स्तरावर विद्यापीठाचा स्तर उंचावण्यासाठी उपाययोजनांबाबत कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही सर्वोच्च विद्यापीठ सल्लागार परिषद आहे.

कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आणि विकासाचा आढावा सादर केला. विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष व आगामी जी-२० बैठकीबाबतच्या योजनांची माहिती दिली. विद्यापीठाच्या वाटचालीबाबत सल्लागार परिषदेने समाधान व्यक्त केले.

शैक्षणिक क्षेत्रातील नवीन आव्हानांच्या पार्श्वूमीवर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याबाबत चर्चा झाली. उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली.

महत्वाचे मुद्दे

– विद्यापीठाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकने

– संशोधन, बौद्धिक स्वामित्व हक्क आणि नवोपक्रम

– आंतरराष्ट्रीयकरण

– राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांशी परस्पर सहकार्य

– संशोधनासाठी अनुदान मिळवणे

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावला आहे. आगामी काळात उपलब्ध असलेल्या जागतिक संधींचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
– संजय किर्लोस्कर, अध्यक्ष, सल्लागार परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ सल्लागार परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यापीठाला लाभत आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे ठरणार आहे.
– डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Source link

Maharashtra TimesPune UniversitySavitribai Phule Pune UniversitySavitribai Phule Universitysppuworld competitionजागतिक स्पर्धापुणे विद्यापीठ
Comments (0)
Add Comment