उच्च शिक्षण विभागामार्फत राज्यभरातील कायम व विनाअनुदानित, तसेच अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र (बीएड) व शारीरिक शिक्षणशास्त्र (बीपीएड) महाविद्यालयांची सोमवार (दि. ८ मे)पासून तपासणी केली जाणार आहे. संबंधित महाविद्यालयांना सुधारित ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय या तपासणीनंतर घेतला जाईल. या तपासणीनंतर अनेक महाविद्यालयांतील त्रुटी बाहेर येण्याची शक्यता आहे.
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीआरटी) व रीहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (आरसीआय) यांनी दिलेल्या निकषांची पूर्तता करणे सर्व बीएड, तसेच बीपीएड महाविद्यालयांसाठी बंधनकारक असते. या महाविद्यालयांना उच्च शिक्षण संचालनालयामार्फत निकषांच्या पूर्ततेच्या आधारावरच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, बहुतांश महाविद्यालये या निकषांची पूर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. योग्य ती शैक्षणिक अर्हता नसलेले प्राध्यापक, शैक्षणिक सुविधा, ग्रंथालये, विद्यार्थिसंख्या याबाबत अनेक महाविद्यालये निकष पूर्ण करीत नसून, त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संचालनालयामार्फत या महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ राज्यभरातील संबंधित बीएड व बीपीएड महाविद्यालयांची ८ ते २२ मेदरम्यान प्रत्यक्ष तपासणी करणार असून, महाविद्यालयांची कागदपत्रे, सुविधा, विद्यार्थी, प्राध्यापक भरतीप्रक्रिया याचा आढावा घेतला जाणार आहे. या तपासणीचा अहवाल शिक्षण संचालनालयाला पाठविला जाणार आहे.
…तरच प्रवेशप्रक्रियेस परवानगी
सीईटी सेलमार्फत नुकत्याच बीएड व बीपीएड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या आहेत. या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील बीएड व बीपीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यापूर्वी ही तपासणी होणार असून, याच्या अहवालावर संबंधित महाविद्यालयाला सुधारित ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ना हकरत प्रमाणपत्र मिळणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांनाच प्रवेशप्रक्रिया राबविण्यास परवानगी मिळणार आहे.