NEET Exam: नीट परीक्षेला उमेदवारांची ९९ टक्के उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर रविवारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील ३५ परीक्षा केंद्रावरून २० हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जीवशास्त्र विषयाचे प्रश्न भौतिकशास्त्राच्या तुलनेत सोपे, तर रसायनशास्त्राच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेनंतर आता विद्यार्थी, पालकांचे निकालाकडे लक्ष असणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) देशभरात विविध शहरातून ‘नीट’ घेण्यात आली. देशभरात १९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

यात छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात एक परीक्षा केंद्र होते. दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत परीक्षा झाली. परीक्षेसाठी सकाळी ११ वाजेपासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. केंद्रावर परीक्षार्थींच्या रांगा होत्या. तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.

परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रांवरून २० हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २० हजार ५०३ विद्यार्थ्यांनी ३६ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. उपस्थितीचे प्रमाण ९९ टक्के होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. मराठी, इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, उर्दू अशा विविध १३ भाषांमधून परीक्षा घेण्यात आली.

पेपर सोपा; चेहऱ्यावर हसू

पेपर सोडवून आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. परीक्षार्थी शेरवा बोरडे म्हणाला, ‘एकंदरीत पेपर सोपा होता. प्रश्नपत्रिकेतील रसायनशास्त्र विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती.’ श्रावणी डोणगावकर हिने सांगितले, ‘जीवशास्त्रातील प्रश्नांचे स्वरूप सोपे होते. भौतिकशास्त्राशी संबंधित प्रश्न मध्यम स्वरुपाचे होते.’ श्रावणी देशमुख म्हणाली, ‘प्रश्नांचे स्वरूप सहज, सोपे होते. फार विचार करायला लावणारे प्रश्न नव्हते.’ सृष्टी तायडे प्रश्नपत्रिकेबाबत म्हणाली, ‘भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांमधील प्रश्नांची काठिण्य पातळी कमी, मध्यम स्वरूपाचीच होती. त्यामुळे निकाल चांगला असेल.’ पुष्कर काळे म्हणाला, ‘प्रश्न सोडविताना वेळ लागला नाही. काही विषयांवर कमी, तर काही घटकांवर अधिक प्रश्न होते; परंतु प्रश्न सोपे होते.’

Source link

Career NewsEducationexamMaharashtra TimesNEETNEET AttendanceNEET Examनीट परीक्षा
Comments (0)
Add Comment