RTE: आरटीई प्रवेशांसाठी आज ‘करो या मरो’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांचे प्रवेश घेण्यासाठी आज, सोमवारी (८ मे) शेवटची मुदत आहे. आतापर्यंत केवळ ४८ हजार ३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ४६ हजार ६६२ मुलांचे प्रवेश अजूनही बाकी आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या मुदतवाढीबाबत पालकांकडूनही विचारणा होत आहे.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तीन लाख ६४ हजार ४१३ पालकांनी अर्ज दाखल केले होते.

त्यानुसार प्रवेशाच्या निवड यादीसाठी पहिली लॉटरी काढण्यात आली असून, त्यामध्ये ९४ हजार ७०० मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, कागदपत्रे पडताळणी समितीकडून ऐन वेळी विविध कागदपत्रांची मागणी आणि इंग्रजी शाळांकडून प्रवेश न देण्याची भूमिका यामुळे प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी ‘आरटीई’ पोर्टलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश

‘आरटीई’ प्रवेशासाठी जिल्ह्यात ९३५ शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ७७ हजार ५३१ मुलांचे अर्ज आले होते. पैकी १५ हजार ५०१ मुलांना प्रवेश जाहीर झाला आहे. प्रवेश जाहीर झालेल्यांपैकी आठ हजार ५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या आकडेवारीनुसार, ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

Source link

Career Newseducation newsMaharashtra Timespune rteRight to EducationRTE Admissionआरटीई प्रवेश
Comments (0)
Add Comment