राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) आयोजित करण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना ६० ते ८० किलोमीटर दूरची परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळी ७.३० वाजता या परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर असून, अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेला पोहचताना धावाधाव होणार आहे.
राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी या प्रवेशपरीक्षेचे आयोजन केले जाते. दरवर्षी राज्यभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यंदाही ११ लाख ८८ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ९ ते २० मेदरम्यान ती होणार आहे. परंतु, या परीक्षेच्या केंद्रांचे वाटप करताना सीईटी सेलने विद्यार्थ्यांचा विचारच केलेला नसल्याचे आढळून आले आहे.
विद्यार्थ्यांना त्या-त्या जिल्ह्यातील ६० ते ७० किलोमीटर दूर अंतरावरील परीक्षा केंद्रे देण्यात आली असून, हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना साडेसात वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आदल्या रात्री संबंधित शहरात पोहोचावे लागणार आहे किंवा पहाटे साडेपाच-सहालाच घर सोडावे लागणार आहे. अनेक शहरांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र विविध तालुक्यांच्या ठिकाणी आल्यामुळे त्यांचीही परीक्षा केंद्रावर पोहचेपर्यंत कसरत होणार आहे.
परीक्षा केंद्र वाटप करतानाच्या या सीईटी सेलच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ होणार आहे. सायंकाळपर्यंत परीक्षा चालणार असल्यामुळे या परीक्षार्थींवर दिवसभर मोठा ताण असणार आहे.
…अशी होणार परीक्षा
सीईटी सेलमार्फत ९ ते २० मे दरम्यान होणाऱ्या या परीक्षेमध्ये ९ ते १३ मेपर्यंत ‘पीसीएम’ व १५ ते २० मे दरम्यान ‘पीसीबी’ ग्रुपसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या केवळ ‘पीसीएम’ ग्रुपसाठी हॉल तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली असून, ‘पीसीबी’ ग्रुपसाठी १० मेनंतर हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या वेळेत दोन सत्रांत प्रवेश परीक्षा होणार आहे. २०० गुणांसाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
अर्ज भरताना मी नाशिक, ठाणे, मुंबई व पुणे या शहरांची निवड केली होती. परंतु, माझा नंबर आता चांदवडच्या केंद्रावर आला आहे. परीक्षेच्या ठिकाणी सकाळी लवकर पोहोचावे लागणार आहे. माझे मूळ गाव चांदवडपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आता तिथून परीक्षा केंद्रावर जाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
-प्रेम देवरे, परीक्षार्थी