NEP: नवीन शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठात ‘टास्क फोर्स’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘टास्क फोर्स’ करणार आहे. विभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकार मंडळासह प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांचा यात समावेश असणार आहे.

उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विविध विद्यापीठांना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यापीठांनी आपापल्या पातळीवर याच्या अंमलबजावणीसाठी त्या दृष्टिकोनातून तयारीही सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने ‘मल्टिपल एन्ट्री मल्टिपल एक्झिट’, पदवी अभ्यासक्रमांना श्रेयांक पद्धती लागू करण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणखी प्रभावीपणे करता यावी, यासाठी विद्यापीठ आता ‘टास्क फोर्स’ स्थापन करणार आहे. त्याद्वारे विद्यापीठातील एकूणच शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. विविध विद्यापीठ स्तरावर होत असलेले बदल, राज्य, केंद्र सरकारच्या सूचना, त्यानुसार मार्गदर्शन, आढावा, अंमलबजावणी दरम्यान महाविद्यालयांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवणे यावर हा ‘टास्क फोर्स’ काम करेल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणातील घटक

संस्थात्मक विकास योजनेसह टप्प्या-टप्प्याने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’ची अंमलबजावणी, नॅक मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांसाठी नॅक मिळविण्याचे वार्षिक लक्ष, पात्र उच्च शिक्षण संस्थांचे स्वायत्त संस्थांमध्ये रूपांतर करणे, शैक्षणिक श्रेयांक पेढीमध्ये नोंदणीकृत अभ्यासक्रमांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या, डिजिलॉकरमध्ये अपलोड केलेल्या प्रमाणपत्रांची, पदवींची संख्या, बहु-विद्याशाखात्मक दृष्टिकोनासह अभ्यासक्रम, पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी अशा विविध २१ घटकांवर लक्ष असणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत संदर्भात राज्यस्तरावर सुकाणू समितीच आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठांतर्गत ‘टास्क फोर्स’ असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यापीठांतर्गत विविध घटकांना मार्गदर्शन; तसेच वेळोवेळी आढावा घेण्याचे काम हा ‘टास्क फोर्स’ करेल.
– डॉ. श्याम शिरसाठ, प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesMarathwada UniversityNEPNEP Task forcenew education policytask forceटास्क फोर्सनवीन शैक्षणिक धोरणमराठवाडा विद्यापीठ
Comments (0)
Add Comment