आरटीई अंतर्गत खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना आता आपल्या पाल्याचा प्रवेश १५ मेपर्यंत निश्चित करता येणार आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायमविनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागे उद्देश आहे. यंदा आरटीई अंतर्गत राज्यातील ८,८२८ शाळांतील एक लाख १,९६९ जागांवरील प्रवेशांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची सोडत ५ एप्रिलला काढण्यात आली.
तर १३ एप्रिलपासून बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच आरटीईचे पोर्टल बंद पडल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यात अडचणी उद्भवत होत्या. परिणामी आरटीई अंतर्गत प्रवेश घेता यावेत यासाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती.
सोमवारी ही मुदत संपुष्टात आली. मात्र, अनेक बालकांचे प्रवेश अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १५ मेनंतर प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.