NEET: कशी होती ‘नीट’? जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मेडिकल आणि डेंटल पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी सुरळीत पार पाडली. नागपुरात विविध केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला शेकडो विद्यार्थी बसले होते.

रविवारी दुपारी २ वाजता परीक्षेला प्रारंभ झाला आणि सायंकाळी ५.२० वाजता ही परीक्षा संपली. विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी २०० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी या विषयांचे प्रत्येकी पन्नास असे एकूण २०० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे होते. एकूण ७२० गुणांची ही परीक्षा होती. बहुपर्यायी स्वरूपात विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारण्यात आले.

बरोबर उत्तरासाठी ४ गुण देण्यात येणार आहेत तर चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कमी केला जाईल. लेखी स्वरुपात ही परीक्षा घेण्यात आली. दुपारी १२ वाजतापासून शहरातील आणि शहराबाहेरील विद्यार्थी परीक्षाकेंद्रांवर येण्यास प्रारंभ झाला. पूर्ण तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षाकक्षात सोडण्यात येत होते. शहरातील सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली आणि कुठेही गोंधळ झाल्याची घटना पुढे आली नाही.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांचे देशभरातील प्रवेश नीटमधील गुणांच्या आधारे केले जातात. परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांचे रॅँकिंग देण्याचे काम एनटीएच्यावतीने केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, इंग्रजी आणि हिंदीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळी, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत अशा भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

Source link

Career Newsdegree coursesDental admissioneducation newsMaharashtra TimesMedical AdmissionNEETNEET AdmissionNEET Examनीट परीक्षा
Comments (0)
Add Comment