दहावीचा निकाल जाहीर होण्याला अजून साधारण एक महिन्याचा कालावधी असला, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला १५ मे पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी प्राथमिक माहिती नोंदणी करून अर्जाच्या भाग एकमध्ये भरता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर सर्व मंडळांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून, येत्या काही दिवसांत ते प्रसिद्ध केले जाणार आहे. साधारण १५ मेपासून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली जात आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी संचालक स्तरावर नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वीच पुण्यासह राज्यातील मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर अशा काही प्रमुख महापालिका कार्यक्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली जाते. त्यानुसार अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरून घेतला जातो. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, तर दुसऱ्या भागात अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आपल्या ज्युनिअर कॉलेजांचे पसंती क्रमांक भरावे लागतात. या प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी उद्बोधन वर्ग घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.