शिक्षणाची आवड असेल तर जगातील कुठल्याही भिंती अडवू शकत नाही, असे म्हटले जाते. या वाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी केले आहे. कारागृहातील सहा बंदीवानांनी बीए अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केली; तर दोघांनी एमएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या सर्व बंदीवानांचा कौतुक सोहळा मध्यवर्ती कारागृहात झाला.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे २००९ साली मध्यवर्ती कारागृहात विशेष अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आली. या अभ्यासकेंद्राच्या माध्यमातून बंदीवानांना मोफत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२२मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या बंदीवानांना पदवी देण्यात आली. याप्रसंगी मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. केशव वाळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. श्याम कोरेटी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ भूषण विजेते डॉ. बी. आर. ठाकरे होते.
बंदीवानांना मार्गदर्शन करताना डॉ. वाळके यांनी कावळ्याच्या कथेमधून बोध घेण्याचा सल्ला दिला. डॉ. कोरेटी यांनी, शैक्षणिक प्रगती करावी असा सल्ला दिला. इग्नूचे विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी बंदीवानांना उपलब्ध विविध संधींबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नरेंद्रकुमार अहिरे, दयावंत काळबांडे, तुरुंगाधिकारी राजेश वासनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कारागृह शिक्षक लक्ष्मण साळवे यांनी केले.
फाशीची शिक्षा झालेल्या तिघांचा समावेश
पदवी मिळालेल्या बंदीवानांमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या तिघांचा समावेश आहे. तिघेही मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आरोपी आहेत. एहतेशाम सिद्दीकी, सेमिदा हनीफ, अशरफ अन्सारी, अशी त्यांची नावे आहेत. सेमिदा हनीफ व अशरफ अन्सारी यांनी बीए, तर एहतेशाम सिद्दीकीने सहा महिन्यांचा वाणिज्य व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.