NEET Exam: कॉपी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत अजब प्रकार

NEET Exam: ‘नीट’ परीक्षेत कॉपीचे प्रकार घडून नयेत यासाठी सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना घातलेले कपडे काढायला लावून ते उलटे घालणे बंधनकारक करण्यात आल्याचा प्रकार घडला. पालकांनी ई-मेलच्या माध्यमातून थेट राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे तक्रारी केल्या आहेत. काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन देऊन संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

वैद्यकीय प्रवेशाकरिता आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षा सात मे रोजी सांगली शहरातील काही केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत कोणी कॉपी करू नये याकरिता परीक्षेचे आयोजन करणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ दक्ष होती; परंतु एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना तपासणीच्या नावाखाली कपडे काढून ते उलटे परिधान करण्यास भाग पाडले.

हतबल झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अखेर उलटे कपडे घालून परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर जेव्हा मुले बाहेर आली, तेव्हा पालकांनी उलटे कपडे घातल्याबद्दल विचारणा केली असता हा प्रकार समोर आला.

दरम्यान, जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर असा प्रकार आढळला नाही. इतर ठिकाणी केवळ ‘एनटीए’च्या सूचनेप्रमाणे ड्रेस कोड आहे की नाही, इतकीच तपासणी केली गेली. एकाच केंद्रात वेगळा नियम का लावला गेला, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

ही घटना कळताच भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ॲड. स्वाती शिंदे यांनी पोलिस प्रशासनास निवेदन दिले आहे. त्यामध्ये ‘नीट’ परीक्षेच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिला आयोगाकडून दखल

सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या या प्रकाराची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागास चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यभरात असे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याची चौकशी करून दोन दिवसांत त्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेलाही त्यांनी पत्र देऊन या प्रकरणी चौकशी करण्याची सूचना केली आहे.

Source link

CareerEducationexamExam CentreMaharashtra TimesNEET ExamSangli Examकॉपीपरीक्षा केंद्र
Comments (0)
Add Comment