कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर संबंधित विषयांनी माणसाचे जगणे बदलविण्यास आता प्रारंभ केला आहे. या बदलत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने याआधीच प्रयत्नांना सुरुवात केली आहे. ‘मेजर’ आणि ‘मायनर’ विषयांच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून निरनिराळे अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्याने उदयास आलेल्या कोणत्या शाखा आहेत हे निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सायन्स, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, एम्बेडेड आणि सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी अशा विषयांचा समावेश होता.
हे विषय आपल्याकडील विद्यार्थ्यांना शिकता यावेत म्हणून विद्यापीठाने त्यांची मेजर आणि मायनर अशा दोन गटांमध्ये विभागणी केली आहे. विविध विषयांचे गट तयार करण्यात आले आहेत. नियमित इंजिनीअरिंगसोबतच या विषयांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना १८ ते २० क्रेडिट घेता येणार आहेत. त्यातून त्यांना पारंपरिक इंजिनीअरिंग विषयातील ऑनर्स पदवी आणि नव्या विषयांचे स्पेशलायजेशन करून ‘मेजर’ अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
‘मायनर’ प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या इंजिनीअरिंगसोबत इतर इंजिनीअरिंग शाखांचे कमी क्रेडिटसचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. त्यासाठी २० इंजिनीअरिंग शाखांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.
‘आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठीची ही व्यवस्था स्वायत्त कॉलेजांमध्ये २०१८पासूनच सुरू झाली आहे. त्यांच्या आता पहिल्या बॅचेस पदवी घेऊन बाहेर पडतील. स्वायत्त नसलेल्या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने २०२०पासून मेजर आणि मायनरची व्यवस्था करून दिली आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार या पदव्यांचे अभ्यासक्रमही अद्ययावत करण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान सर्वत्र प्रचलित होत असताना नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करण्याच्या प्रयत्नांना आम्ही सुरुवात केली आहे’, असे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांनी सांगितले.
बीएस्सीतही यंदापासून ‘एआय’
इंजिनीअरिंग शाखेप्रमाणे विज्ञान शाखेतही आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आता दिले जाणार आहे. २०२३-२३ या शैक्षणिक सत्रापासून बीएस्सी-कृत्रिम बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याशिवाय, माहिती तंत्रज्ञान, डाटा सायन्स आणि कम्प्युटर या विषयात याआधीच बीएस्सीची पदवी देण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून तीनऐवजी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही राबविला जाणार आहे.