लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करणाऱ्या एका आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरती उतरली आणि नुसती पासच झाली नाही, तर पुणे शहर पोलिस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली. ओझर येथील मरिमाता गेट येथे राहणारी अपूर्वा हिची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत पुणे शहर पोलिस दलात वाहनचालक पदावर निवड झाली असून, ती मुलींमध्ये पहिली आली आहे.
अपूर्वाचा ज्या दिवशी पोलिस भरतीचा लेखी पेपर होता, त्याच दिवशी तिचे वडील नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलरकाम करणारे राजू वाकोडे यांना पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. याही स्थितीत अपूर्वाने जिद्द न सोडता लेखी परीक्षा दिली. पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहचताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
अपूर्वाची आई लोकांच्या घरोघरी जाऊन धुणीभांडी करते. वेळप्रसंगी द्राक्षबागेच्या व कांद्याच्या चाळीवर कामाला जाते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत करते. काम करूनच तिने बी. कॉम. पूर्ण केले. दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास तिने प्रोत्साहन दिले. परिस्थिती नाजूक असतानाही त्याची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने यश मिळवले.
तिच्या अंगी असलेली जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहे. एका कंपनीच्या माध्यमातून तिने मोटार ड्रायव्हिंग क्लास पूर्ण केला होता. या प्रशिक्षणानंतर तिने पोलिस वाहनचालक पदासाठी फॉर्म भरला होता.