आनंदाची बातमी! मिरा-भाईंदर पालिकेच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर

मिरा-भाईंदर महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीप्रक्रिया राबवण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला होता. परंतु पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे दर्शवणारी बिंदू नियमावली अद्ययावत नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. मात्र कोकण विभागीय आयुक्तांनी सुधारित नियमावलीला मंजुरी दिल्यामुळे भरती प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच यासाठी पालिका प्रशासनाकडून संस्थेची नियुक्ती केली जाईल.

मिरा-भाईंदर पालिकेतील काही रिक्त पदे भरण्यासाठी शेवटची भरतीप्रक्रिया २०१५मध्ये राबवण्यात आली. त्यानंतर मागील आठ वर्षांत कोणत्याही पदांसाठी भरतीप्रक्रिया ही आस्थापना खर्चावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेली नाही. परिणामी, पालिकेतील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची संख्या एक हजार ३०० हून अधिक आहे. त्याचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिरा-भाईंदर महापालिकेला भरतीप्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या. पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार महत्त्वाची ३३९ पदे भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी बिंदू नियमावली अद्ययावत नसल्याने भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. म्हणून पालिकेने ‘क’ व ‘ड’ गटातील कर्मचाऱ्यांची सुधारित बिंदू नियमावली मंजूर करण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना सादर केला होता. अखेरीस ही नियमावली मंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली. त्यामुळे ‘क’ आणि ‘ड’ गटातील भरतीप्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांतच पालिका टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस) व आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ) यातील एका संस्थेची भरती प्रक्रियेसाठी निवड करणार आहे. तदनंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

‘अ’ व ‘ब’ गटातील भरती दुसऱ्या टप्प्यात

मिरा-भाईंदर महापालिकेत ‘अ’ व ‘ब’ गटांतील काही पदे भरण्याच्या दृष्टीने बिंदू नियमावली राज्य सरकारकडे पालिकेने मंजुरीसाठी सादर केली आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात ‘अ’ व ‘ब’ गटांतील पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाईल.

Source link

Maharashtra TimesMira Bhyander JobMunicipality recruitmentPalika Jobrecruitmentभरती प्रक्रियामिरा-भाईंदर पालिका
Comments (0)
Add Comment