पालघर तालुक्यातील नंडोर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सन २०१९पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. मात्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा बंद करण्याचा निर्णय आदिवासी विकास प्रकल्पाने घेतला आहे. अचानकपणे इंग्रजी माध्यमाची शाळा बंद झाल्याने आता कोणत्या शाळेत जायचे, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे. तिसरीच्या वर्गात आठ तर चौथीच्या वर्गात १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यावे, या अपेक्षेने जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्रमगडमधील आदिवासी भागातील पालकांनी त्यांच्या पाल्यांना नंडोरे येथील आश्रमशाळेमध्ये सन २०१९मध्ये दाखल केले होते. मात्र आता अचानक इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय डहाणूच्या आदिवासी विकास प्रकल्पाने घेतल्याने २० पालकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मौखिक आदेशाने ही शाळा सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने हात वर केल्याने आता या मुलांची आणि त्यांच्या पालकांची कोंडी झाली आहे.
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्याने डहाणू तालुक्यातील १७, पालघर तालुक्यातील दोन व विक्रमगड तालुक्यातील एक विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. इंग्रजी शिकायला मिळेल म्हणून पालकांनी त्यांना पालघरजवळ नंडोरे आश्रमशाळेत शिक्षणासाठी पाठवले. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तासिका पद्धतीने दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करताना आधी मान्यता घेऊन शाळा सुरू करणे गरजेचे असताना कोणत्याही प्रकारची मान्यता न घेता मौखिक आदेशाने ही शाळा सुरू करण्यात आल्याचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संजिता मोहोपात्र यांनी सांगितले, मात्र मौखिक आदेशाने शाळा कशी काय सुरू होऊ शकते, असाही प्रश्न यानिमित्ताने पालक वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्याध्यापकही गोंधळलेले
या २० मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश देणार, याबाबत मुख्याध्यापकांना विचारले असता, आधी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांची व्यवस्था करू, असे सांगितले. नंतर मात्र काही वेळाने इथेच त्यांना मराठी माध्यमातून तिसरी-चौथीच्या वर्गात प्रवेश देणार असे सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश द्यायचा, याबाबत मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमावस्था दिसून आली.
वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशाचे आम्ही पालन केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या मान्यतेसाठी प्रकल्प कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.
– संजय खरूळे, प्रभारी मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, नंडोरे
आयत्यावेळी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. असे प्रकार घडू नयेत आणि घडले तर त्यास प्रशासन जबाबदार राहील. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान त्यांनी करू नये. त्यांच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना कशासाठी?
– राजेश पाटील, आमदार, बोईसर
प्रस्ताव पाठवण्यासाठी मी कार्यालयाला सांगितले आहे. आयुक्त कार्यालयात यासंबंधी सभा आहे. त्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– संजिता मोहपात्र, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, डहाणू