केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली. त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली; तसेच त्याचा निकालही जाहीर करण्यात आला.
मात्र, अजूनही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार केले आहे. त्यानुसार शाळांची संचमान्यता १५ मेपर्यंत अंतिम केली जाणार आहे.
संचमान्यतेनंतर बिंदूनामावली प्रमाणित करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद ‘पवित्र’ पोर्टलवर करणे, पहिल्या तिमाहीसाठीच्या जाहिरातींनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, शिफारस करणे अशा प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. शिक्षकभरती प्रक्रियेसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून ‘पवित्र’ प्रणालीवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेतल्या जातील.
पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, या पूर्वीच्या १२ हजार ७० पदांच्या शिक्षक भरतीत विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या दीड हजार जागाही भरण्यात येणार आहे. यापूर्वीच्या पदभरतीद्वारे एकूण सात हजार ९०३ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे.
चार लाख विद्यार्थी ‘आधार’विना
शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हानिहाय आधार कार्ड कार्यवाहीबाबत दोन मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी १३ लाख ८५ हजार ३०२ विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ९३ हजार ३६२ विद्यार्थी आधार कार्डविना आहेत. पैकी ४८ लाख २९ हजार ९३१ विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची वैधतेसंदर्भातील प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे साधारण ७७.४१ टक्के विद्यार्थ्यांची आधारकार्डे वैध ठरली आहेत, असे सांगण्यात आले.