दहावी, बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलत गुणांवर पाणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

दहावी, बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यंदा सवलतीच्या गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाकडून क्रीडा अधिकाऱ्यांना प्रस्तावाचे वेळापत्रक, पत्रासह दोन स्मरणपत्र पाठविण्यात आली. मात्र, विभागातील परभणी वगळता इतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी प्रस्तावच पाठवले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेत विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. त्यासंबधीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून शिक्षण मंडळाला सादर केले जातात. शिक्षण मंडळाने क्रीडा विभागाला प्रस्ताव सादर करण्यासाठी आठ मेपर्यंत मुदत दिली होती. वारंवार शिक्षण मंडळाने क्रीडा अधिकाऱ्यांना पत्र पाठविले. परंतु यानंतरही मुदतीत अनेक जिल्ह्यांचे प्रस्तावच आले नसल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावात त्रुटी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रस्ताव शेवटच्या दिवशी आठ मे रोजी आले. यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांशी मंडळातील अधिकाऱ्यांनी संपर्क केल्याचेही कळते. प्रस्ताव आले परंतु ते अधर्वट होते. त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने शिक्षण मंडळाने जिल्हा क्रीडा कार्यालयाला हे प्रस्ताव परत पाठविले.

पत्र, स्मरणपत्रासह फोनद्वारे संपर्क

शिक्षण मंडळाकडून पत्र, स्मरणपत्र वारंवार फोन करून प्रस्तावांसाठी संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात येते. २५ मार्चला प्रस्तावांबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले. प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यासह दोन वेळा स्मरणपत्र देण्यात आली तरी प्रस्ताव आले नसल्याचे सांगण्यात येते. मंडळाने स्मरणपत्रात म्हटले होते, ‘शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडु विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव आठ मेपर्यंत सादर करावेत. या प्रकरणी प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. प्रस्ताव आवश्यक ती सर्व कार्यवाही करून कार्यालयास त्वरित पाठवावेत.’ मात्र, त्यानंतरही प्रस्ताव देण्यात आले नाहीत.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विभागीय मंडळाकडे आठ मेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती. आम्ही अधिकाऱ्यांना दोन स्मरणपत्रे दिली; तसेच संपर्क साधला. मात्र, परभणी वगळता इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव आले नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रस्ताव आले होते, परंतु त्यात त्रुटी होत्या. त्यामुळे ते प्रस्ताव आम्ही परत पाठविते. मुदतीत प्रस्ताव आलेले नाहीत. त्यामुळे सवलतीचे गुणांपासून विद्यार्थी वंचित राहतील, ही बाब आम्ही पूर्वीच क्रीडा अधिकाऱ्यांना कळविली आहे.
विजय जोशी, विभागीय सचिव,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Source link

10th students12th Studentsconcession marksHSC studentsMaharashtra Timessportsmen studentsSSC studentsखेळाडू विद्यार्थीदहावी विद्यार्थीबारावी विद्यार्थीसवलत गुण
Comments (0)
Add Comment