महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ३१ मेपूर्वी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल शुक्रवारी एकाच दिवशी जाहीर केल्यामुळे, राज्य मंडळाचा निकाल कधी जाहीर होणार, याबाबत विचारणा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने निकालांबाबत सुतोवाच दिले आहेत.
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा दोन ते २५ मार्च या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली. बारावीची परीक्षा साधारण १४ लाखांच्या आसपास, तर दहावीची परीक्षा साधारण १५ लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी दिली आहे. या दोन्ही परीक्षा होऊन साधारण दीड महिन्यांचा कालावधी उलटला असल्याने, विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काही दिवस शैक्षणिक कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे साधारण आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामे होऊ शकली नाहीत.
संपाचा दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर फारसा फरक पडला नाही. मात्र, त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीला वेग आला. सध्याच्या परिस्थितीत विभागीय मंडळाकडून निकाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य मंडळाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन्ही निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ