संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित होत असलेल्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातील विविध विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा २ स्तरावर संपन्न होते. प्रथम स्तर हा विभागीय स्तर असतो तर अंतिम स्तर हा राष्ट्रीय स्तर असतो. एकूण सहा विभागीय स्तरातून पहिल्या आलेल्या संघाच्या स्पर्धेची अंतिम फेरी सुरू असून याच फेरीचे सादरीकरण आज करण्यात आले.
संसदेच्या अधिवेशन काळामध्ये दैनंदिन कामकाजामध्ये ज्याप्रमाणे प्रश्नोत्तराचा तास, ध्यानाकर्षण प्रस्ताव, विशेषाधिकार भंगाची सूचना, अल्पकालीन चर्चा, विधेयकाला मान्यता देणे इ. कामकाज असते त्याचे अभिरूप सादरीकरण या स्पर्धेमध्ये ५५ मिनिटांच्या अवधीमध्ये करावयाचे असते.
आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. संसदीय कार्य मंत्रालयाच्या नियमानुसार परीक्षक म्हणून संसदीय कार्य विभागाचे उपसचिव अशोक आचार्य, माजी संसद सदस्य ब्रतिन सेनगुप्ता आणि शिक्षणतज्ञ डॉ. वैभव सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
युवा संसद स्पर्धेमध्ये उत्तम सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक अंकिता गोयल या विद्यार्थीनीस प्रदान करण्यात आला तर, द्वितीय पारितोषिक अनुष्का मोरे आणि मेहेर काझी यांना देण्यात आला. आयेशा खोत, संजना जोशी आणि श्रृष्टी मेटांगे या विद्यार्थीनीस तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले आणि प्रतिक्षा गायकवाड आणि मृण्मयी सुपाळ यांना चतूर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के, प्रभारी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या भविष्कालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास विभागाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. (डॉ.) हर्षद भोसले, अविनाश ओक आणि निलेश सावे यांनी काम पाहिले.