राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यभरातील ६७४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून, त्यात नाशिक महापालिका हद्दीतील चार शाळांचा समावेश आहे. या शाळा तत्काळ बंद करण्याचे निर्देश महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला दिल्यानंतरही या शाळा सुरूच आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळांच्या संचालकांसह मुख्याध्यपकांना शाळा बंद करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. शाळा ४८ तासांत बंद केली नाही, तर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत फेब्रुवारी महिन्यात राज्यभरातील ६७४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. यात नाशिक जिल्ह्यातील १२ शाळा असल्याचे निदर्शनास आले होते. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील चार शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या पत्रानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने एमराल्ड हाईट पब्लिक स्कूल (जेलरोड), वंशराजे हिंदी मीडियम स्कूल (सातपूर), खैरूल बनात इंग्लिश मीडियम स्कूल (वडाळा)Ḥ आणि गांधी विद्या मंदिर संस्थेची प्राथमिक शाळा कॅनडारोड या चारही शाळांना नोटीस काढत त्या तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाने केले होते.
या शाळांच्या व्यवस्थापनाला यासंदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या. तरीही शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या शाळांच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना अखेरची ४८ तासांची नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतरही शाळा सुरू आढळल्यास थेट मुख्याध्यपक आणि शाळांच्या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
अशी आहे दंडाची तरतूद
– सरकारच्या मान्यतेशिवाय सुरू असणाऱ्या अनधिकृत शाळांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद शासन निर्णयात
– हा दंड भरूनही शाळा सुरूच राहिल्यास प्रतिदिवशी १० हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्याचा आदेश
– अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या शाळांना नोटीस देऊन त्या तातडीने बंद करण्याचा आदेश शिक्षण विभागामार्फत दिल्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास त्यांना एक लाखाच्या दंडासोबतच प्रति दिन १० हजार रुपयांचा दंड