हायलाइट्स:
- कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील भीषण वास्तव.
- करोना महामारीत दीड हजारावर मुलांनी पालक गमावले.
- १८ वर्षाखालील ३६ मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू.
कोल्हापूर: राज्यभरातील करोनाचा विळखा सैल झाला असला तरी अजूनही दक्षिण महाराष्ट्रात रोज हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. या भागात करोना संसर्गाने थैमान घातल्याने तीन जिल्ह्यांत तब्बल दीड हजारावर मुलांचे पालकत्व हिरावले आहे. दक्षिण महाराष्ट्रात १८ वर्षांखालील ३६ मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या अनाथ मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तरीही आई आणि वडील या दोघांचेही छत्र हरविलेल्या मुलांसमोर मात्र जगण्याची लढाई लढण्याचे मोठे आव्हान उभे आहे. ( Maharashtra Coronavirus Latest Updates )
वाचा:जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या सर्व पायवाटा केल्या बंद!; कारण…
गेल्या दीड वर्षात राज्यात करोनाने अनेकांचा जीव तर घेतलाच शिवाय आर्थिक संकटाने अनेकांना जगणेही मुश्किल केले आहे. विशेषत: करोनाने पालकांचा मृत्यू झाल्याने मुलांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे. मुंबई, पुण्यासह इतर अनेक शहरांत आणि जिल्ह्यांत करोनाची दुसरी लाट लवकर ओसरली. त्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आजही रोज दीड हजारावर करोनाचे रुग्ण सापडत आहेत. वीस ते पंचवीस लोकांचा बळी दररोज जात आहे. यामुळे या भागात आजही भीतीची छाया कायम आहे. दक्षिण महाराष्ट्रात वर्षभरात दहा हजार लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. यामध्ये बहुतांशी पालकांचा समावेश आहे. आई किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. त्यामध्ये कोल्हापूर ४३०, सातारा ५९८ तर सांगली जिल्ह्यातील ५९२ जणांचा समावेश आहे. आई आणि वडील या दोघांचाही मृत्यू झाल्याने या भागातील ३६ मुले अनाथ झाली आहेत. त्यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
वाचा:करोना: किती टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या; महापालिकेचे ५ वे सिरो सर्वेक्षण
सरकारने अशा मुलांसाठी मदतीचा हात म्हणून दरमहा ११०० रुपये देण्यास सुरुवात केली आहे. आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या मुलांच्या खात्यावर पाच लाख रुपये ठेवण्यात येणार आहेत. ही रक्कम त्यांना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. या सर्व मुलांची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हा कृती दल समिती ( टास्क फोर्स ) स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे त्याचे प्रमुख आहेत. नातेवाईकांकडे राहणाऱ्या अनाथ बालकांना दरमहा प्रत्यक्ष भेट देऊन ही बालके नातेवाईकांकडे सुरक्षित असल्याची खात्री करण्याची जबाबदारी टास्क फोर्सवर सोपविण्यात आली आहे.
पालकत्व हरविलेली मुलं (कंसात दोन्ही पालक नसलेले )
कोल्हापूर – ४३० ( ७ )
सांगली – ५९२ (१२)
सातारा – ५९८ (१७)
करोनामुळे बाधित झालेल्या बालकांना बाल संगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाकडून सुरू आहे. पालकत्व नसल्याने भविष्य अंधारमय होवू नये यासाठी मदतीचा हात दिला जात आहे – सुजाता शिंदे, महिला व बाल विकास अधिकारी
वाचा:शरद पवारांच्या नावाने आणखी एक धमकीचा फोन; ५ कोटी दे नाहीतर…!