ICSE: ‘आयसीएसई’ दहावीच्या परीक्षेत मुंबईकर चमकले

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘इंडियन सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन’ (आयसीएसई) मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ९९.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, देशपातळीवर ९८.९४ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात किंचित घट झाली आहे. यंदाच्या परीक्षेत मुंबईतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, पहिल्या रँकमधील नऊ मुलांमध्ये मुंबईतील चौघांचा व ठाण्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश समावेश आहे. या सर्वांना ९९.८० टक्के गुण मिळाले आहेत.

यंदाही या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात ९९.८९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, देशपातळीवर ९९.२१ टक्के मुलींनी यश संपादन केले आहे. राज्यातील १४ हजार ६१४ मुलांनी, तर १२ हजार ४८१ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील केवळ ३२ मुले आणि १४ मुली अनुत्तीर्ण झाल्या.

‘सीबीएसई’ मंडळाच्या दहावीच्या परीक्षेप्रमाणेच ‘आयसीएसई’ मंडळाच्या परीक्षेच्या निकालातही दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिले आहे. दक्षिणेतील राज्यांतील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.२० टक्के आहे. त्याखालोखाल पश्चिम भारतातील विद्यार्थ्यांचे ९८.३४ टक्के प्रमाण आहे. तर सर्वांत कमी प्रमाण उत्तरेकडील राज्यांतील विद्यार्थ्यांचे असून, तेथील ९६.५१ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्यावर्षी ‘आयसीएसई’चा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के लागला होता. तर, करोनापूर्वी २०१९मध्ये ९८.५४ टक्के लागला होता.

‘नियमित अभ्यासातून मिळालेले यश’

‘देशात पहिल्या रँकमध्ये आल्याने आनंद होत आहे. वर्षभर नियमित अभ्यास करून हे यश मिळविले आहे. केवळ शाळेतील अभ्यासावरच हे गुण मिळाले आहेत. वडिलांना नोकरीनिमित्त इंग्लडमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे मी पुढील शिक्षण तिकडेच घेईन, अशी प्रतिक्रिया देशात पहिला रँक मिळविलेल्या मुंबईतील अद्वय सरदेसाई याने दिली.

बारावीच्या ‘इंडियन स्कूल सर्टिफिकेट’ (आयएससी) परीक्षेत राज्यातील ९८.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, देशपातळीवर ९६.९३ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

देशातील एक हजार २९१ शाळांतील ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात ५१ हजार ७८१ विद्यार्थी, तर ४६ हजार ७२४ विद्यार्थिनींनी समावेश होता. यंदा या परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्यावर्षी ९९.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तसेच, करोनापूर्वी ९७.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे करोनापूर्वीच्या तुलनेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किंचितसे वाढले आहे.

राज्यातील केवळ चार हजार ११३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलींची संख्या दोन हजार १७९, तर मुलांची एक हजार ९३४ आहे. यातील दोन हजार १५७ विद्यार्थीनी आणि एक हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच २२ मुली आणि ३२ मुले अनुत्तीरण झाले आहेत.

Source link

10th result12th ResultHSC ResultICSEICSE ResultMaharashtra Timesssc resultआयसीएसईदहावी निकालनिकाल
Comments (0)
Add Comment