विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयआयटी मुंबईत प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षाचा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी दोन विषय वगळले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रथम वर्षाच्या शेवटी शाखा बदलण्याचा पर्याय येत्या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिसभा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी अंतर्गत समिती नेमण्यात आली होती. या समितीने विविध उपाययोजना सुचवणारा अहवाल आयआयटी प्रशासनाला दिला होता. दर्शन सोलंकी या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीने हा अहवाल सादर केला होता. त्यातील प्रस्तावांवर २५६व्या अधिसभा बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयआयटी प्रशासनाने हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
आयआयटी मुंबईला प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे वातावरण नवीन असते. या विद्यार्थ्यांना या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जातो. तसेच या स्पर्धात्मक वातावरणात त्यांच्यावर अभ्यासाचाही ताण असतो. पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना दोन सत्रे असतात. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रत्येक सत्रातील एक विषय वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अन्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
त्याचबरोबर आयआयटी मुंबईत प्रवेशासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांची रांग लागलेली असते. काही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असतो. त्यामध्ये कम्प्युटर सायन्ससारख्या शाखांचा समावेश आहे. आयआयटीत दुसऱ्या वर्षाला विद्यार्थ्यांना शाखा बदलण्याचा पर्याय असतो. त्यातून पहिल्या वर्षाला प्रवेश घेताना जर एखाद्या विद्यार्थ्याला रँकमध्ये पसंतीच्या शाखेला प्रवेश न मिळाल्यास ते दुसऱ्या शाखेला प्रवेश घेतात. हे विद्यार्थी वर्षाच्या शेवटी पसंतीची शाखा मिळविण्यासाठी प्रयत्नरत राहतात. मात्र यासाठीही मोठी स्पर्धा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रवेशापासूनच अभ्यासाचा ताण असतो. हा ताण दूर करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाच्या शेवटी शाखा बदलण्याचा पर्याय रद्द केला जाणार आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांचा ओढा असलेल्या शाखांच्या जागा प्रवेशावेळीच वाढविल्या जाणार आहेत, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी दिली.