बारावी उत्तरपत्रिकांमधील अक्षरबदलाचा गुंता सोडविण्यासाठी शिक्षण मंडळाने पाऊले टाकले असून, या प्रकरणी केंद्रप्रमुखांना नोटिसा पाठविल्या आहेत. उत्तरपत्रिकेत अनियमितता, गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. मंडळाच्या सुचनांचे पर्यवेक्षक, अन्य घटकांनी उल्लंघन करण्यामागचा हेतू काय असा सवाल करून, अधिकाऱ्यांसमोर सत्यस्थिती मांडा, असे मंडळाने नोटिशीत स्पष्ट केले आहे.
दालन पर्यवेक्षकांचे म्हणणे घेऊन केंद्रप्रमुखांना मंडळात सोमवारपासून हजर रहावे लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या नोटिशीनंतर शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उत्तरपत्रिकेतील आक्षेपार्ह लिखाणाबाबतच्या प्रकारांवर लक्ष वेधले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च दरम्यान झालेल्या दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांची सुनावणी सुरू आहे.
परीक्षा कालावधीतील गैरप्रकारांबाबत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाल्या. परीक्षेत्तर गैरप्रकारांची सुनावणी ९ ते १३ मे दरम्यान झाली. उत्तरपत्रिकेत उत्तरांशिवाय कोणताही मजकूर आक्षेपार्ह ठरतो. या प्रकरणात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी झाली. यात सर्वांत गंभीर बाब म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील अक्षरबदलाचा प्रकार समोर आला. बहुतांशी भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित हे गैरप्रकार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी हा पेपर झाला होता. सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांनी हे हस्ताक्षर नसल्याचे म्हटले.
अर्धवट उत्तरे पूर्ण लिहण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. शिक्षण मंडळात आलेल्या पालकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची सुनावणीनंतर मंडळाने केंद्रप्रमुखांना नोटीस पाठवून, या प्रकरणात खुलासे मागविले आहेत. मंडळाच्या नोटीसनंतर शिक्षकांमध्ये खळबळ उडाली.
सोमवारपासून ही सुनावणी होत आहे. अक्षरबदलाचा गंभीर प्रकाराचा छडा लावण्यास मंडळ यशस्वी होते का, या प्रकरणी कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तरपत्रिकेतील अक्षरबदल प्रकाराबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ प्रकाश टाकला होता. यानंतर मंडळाने कारवाईची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.
नोटिशीत काय म्हटले?
शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे, की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेत अनियमितता, गैरप्रकार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मंडळाच्या सूचनांचे पर्यवेक्षक किंवा अन्य घटकांनी उल्लंघन करण्यामागचा हेतू काय होता. बैठक क्रमांकाचे दालन पर्यवेक्षक व आपण केंद्रसंचालक म्हणून सर्वत्रिक महत्त्वाच्या परीक्षेच्या कामामध्ये हायगय व निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. याबाबत चौकशी अधिकाऱ्यांसमोर सत्यस्थिती मांडण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे. त्यानंतर आपणास काहीही म्हणावयाचे नाही, असे समजून कसल्याही प्रकारची संधी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
सोमवारपासून सुनावणी
दालन पर्यवेक्षकांच्या निवेदनासह केंद्रप्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्या, सोमवारपासून (१५ मे) सुनावणी सुरू होत आहे. सकाळी ११ वाजेपासून विभागीय मंडळात सुनावणी होणार आहे. खुलासा सादर न केल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीत जाबाबदार राहाल, असे मंडळाने स्पष्ट केले.