देशभरातील महाविद्यालयांतील सहयोगी प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट) दि. १३ ते २२ जूनदरम्यान होणार आहे.
‘एनटीए’मार्फत या परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. सहयोगी प्राध्यापकपदासह ज्युनिअर रीसर्च फेलोशिपसाठीही ही परीक्षा घेतली जाणार आहे.
जून महिन्यात एकूण ८३ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. १० मेपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३१ मे रोजी सायंकाळी पाचपर्यंत अर्ज भरण्याची, तर १ जूनला रात्री ११.५० पर्यंत शुल्क भरून अर्ज निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे.
२ ते ३ जूनदरम्यान अर्जात काही दुरुस्ती असल्यास ती विद्यार्थ्यांना करता येणार असून, त्यानंतर मात्र दुरुस्ती करता येणार नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांची घोषणा केली जाईल.
दुसऱ्या आठवड्यात ‘एनटीए’च्या वेबसाइटवर हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. परीक्षेसंबंधी अन्य माहितीही कालांतराने ‘एनटीए’मार्फत जाहीर केली जाईल. दि. १३ ते २२ जूनदरम्यान निर्धारित परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल.
अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना एक हजार १५० रुपये, ईडब्लूएस, ओबीसी-एनसीएल प्रवर्गांसाठी ६६० रुपये, तसेच एससी, एसटी, पीडब्लूडी आणि तृतीयपंथीयांसाठी ३२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड् टेस्ट (सीबीटी) राहणार आहे.