मराठवाड्यातील झेडपी शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी; तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.

या संदर्भात १३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक संघटनांची सहविचार सभा झाली होती. त्यात यावर चर्चा झाली होती. परीक्षा आयोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी विभागीय संनियंत्रण समिती असेल. त्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त, सदस्य सचिव प्रादेश विद्या प्राधिकरण संचालक, सदस्य उपायुक्त विकास, विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर, शिक्षण उपसंचालक लातूर यांचा समावेश असेल.

समितीने प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समिती सुपूर्द करणे, समिती सदस्यांनी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्ह्यांना पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष सीइओ जिल्हा परिषद, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), सदस्य अतिरिक्त सीइओ, प्रकल्प संचालक डीआरडीए, डेप्युटी सीइओ (सामान्य प्रशासन)आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

याशिवाय आर्थिक नियोजन, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, छपाई, सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम, ओएमआर मशीन उपलब्धतता, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल, केंद्रनिश्चिती, बैठक व्यवस्था, परीक्षा संचलन सुरळीतपणे पार पाडणे आदी जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात माहिती

– परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असेल. निकालानुरूप कुठलीही कारवाई शिक्षकांवर होणार नाही.

– परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शिक्षकांना कळविणे.

– जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.

– विभागातील परीक्षेसाठी तारीख व वेळ सर्व जिल्ह्यांसाठी एकच असणार आहे.

– परीक्षेची तारीख व वेळ, विहित प्रपत्रे, पेपर तपासणीची तारीख स्वतंत्रपणे कळविली जाणार आहे.

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल.

– प्रत्येक प्रश्नपत्रिका ५० प्रश्न, वस्तुनिष्ठ स्वरूपाची व ५० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास एक गुण, चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील.

– परीक्षेचा कालावधी एक तास.

– ५० टक्के व त्याहून अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल.

Source link

Career Newseducation newsMaharashtra Timesmarathwadamotivation testTeacher motivationTeacher TestZP teachersझेडपी शिक्षकमराठवाडाशिक्षक प्रेरणा परीक्षा
Comments (0)
Add Comment