‘शिक्षकांनी विविध विषयांवर वाचत राहावे, सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी. चालू घडामोडींवर लक्ष ठेवून स्वतःला अपडेट करावे. स्वतःच्या वाचकवर्गाला आवडेल आणि रूचेल असेच लेखन करावे,’ असा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी शिक्षकांना दिला.
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शिक्षक लेखन कार्यशाळेत डॉ. काळपांडे बोलत होते. या एकदिवसीय कार्यशाळेला राज्यभरातून निवडक अशा लिहित्या शिक्षकांची निवड करण्यात आली होती. शैक्षणिक विषयावरचे लेखन, शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसाठीचे लेखन कशा स्वरूपाचे असावे, याबाबतचे मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. बालभारतीच्या माजी विद्यासचिव धनवंती हर्डीकर, मंचाचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
काळपांडे म्हणाले, ‘लेखात अलंकार, प्रतिक्रिया याचा शक्यतो वापर करू नये. पारिभाषिक शब्दांचा वापर योग्य त्या ठिकाणी करावा. कोणत्याही बाबींचे अवडंबर न करता, त्याचे कर्मकांड होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाचा; तसेच वैचारिक मांडणीचा विकास होत राहील आणि लिहिण्याला बळ मिळेल. लेखनात सहजता, सोपेपणा, नेमकेपणा, अचूकता असावी.’ योगेश कुदळे यांनी स्वागत केले. अजित तिजोरे यांनी आभार मानले. तुषार म्हात्रे, संजना पवार यांनी कार्यशाळचे यशस्वी आयोजन केले.
‘विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून वाचन करावे’
‘शिक्षक-लेखकांनी भरपूर वाचावे, विविध भाषेतील पुस्तके वाचावीत. भाषांतरीत साहित्याकडे गंभीरपणे पाहून आपल्या वाचनासाठी, लेखनासाठी, अध्यापनासाठी त्याचा उपयोग कसा होईल याचा विचार करावा. जागतिक स्तरावरील वाङ्मय वाचून, त्याची चर्चा घडवून आणावी. समाजाशी, विद्यार्थ्यांशी जोडून लेखन, वाचन या संदर्भातील विविध प्रकल्प घ्यावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून वाचन करावे आणि लिहावे. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्यास मदत होईल,’ असे हर्डिकर यांनी सांगितले.