हायलाइट्स:
- आदिमाता चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रा रद्द.
- जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या सर्व पायवाटाही बंद.
- १३ ते १५ ऑगस्टपर्यंत राहणार भाविकांना मनाई.
कोल्हापूर: जोतिबा डोंगरावरील चैत्री यात्रेपाठोपाठ आदिमाता चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्राही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवस डोंगरावर भाविकांनी येऊ नये यासाठी सर्व वाटा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यात्रा रद्द करण्यात आली असल्याने त्यासाठी कुणीही भाविकांनी डोंगरावर येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी अमित माळी यांनी केले आहे. ( Jyotiba Dongar Covid Restrictions )
वाचा: राज्यात १५ ऑगस्टपासून सर्वात मोठा ‘अनलॉक’; अशा आहेत गाइडलाइन्स
दरवर्षी एप्रिल महिन्यात होणारी जोतिबा डोंगरावरील चैत्री यात्रा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे रद्द करण्यात आली. ठराविक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गेले सहा महिने धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची संख्या कमी आहे. अशावेळी चैत्री पाठोपाठ आता चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्राही रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह विविध राज्यांतील हजारो भाविक येत असतात. यंदा १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान होणारी ही यात्रा अतिशय साधेपणाने करण्यात येणार आहे. धार्मिक व पारंपारिक विधी अतिशय साधेपणाने करण्यात येणार असल्याने भाविकांनी डोंगरावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसे आदेशही जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि देवस्थान समितीने बजावले आहेत. ग्रामीण भागातून जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती यांच्या वतीने जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी भाविकांनी करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
वाचा: राज्यासाठी लॉकडाऊनचा निकष ठरला!; CM ठाकरे यांची खूप मोठी घोषणा
दरम्यान, कोविड संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी कोविड वरील लसचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना १५ ऑगस्टपासून विविध प्रकारच्या सवलती मिळणार आहेत. त्याचवेळी इतर बाबतीत मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे यापुढेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच यात्रा आणि उत्सवांवर मर्यादा राहणार आहेत.
वाचा:शरद पवारांच्या नावाने आणखी एक धमकीचा फोन; ५ कोटी दे नाहीतर…!