हायलाइट्स:
- मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामने
- संसदेत शुक्रवारी गदारोळ
- महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीका
मुंबईः ‘संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी हे मौन बाळगून बसले होते की, त्यांची तोंडे बंद केली होती?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
मराठा आरक्षणावरुन संसदेत शुक्रवारी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘५० टक्क्यांचा मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करत आहे. पण मराठा समाज सर्वकाही जाणतो, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, स्वतः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, पण छत्रपतींचेच वंशज ते! ते बोलायला उभे राहिलेच, पण भाजपातील इतर मराठय़ांचे काय? त्यांनी तर तसा अवसानघातच केला,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
‘महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजालाच नव्हे तर देशभरातील जाट, गुर्जर, पटेल वगैरे अनेक समाजांच्या लोकांना या विधेयक मंजुरीचा फायदा मिळणार आहे, पण एक मात्र मान्य करावेच लागेल. महाराष्ट्रात मराठा समाजातील तरुणांनी आंदोलने करून क्रांतीची मशाल भडकवली नसती, तर काहीच घडले नसते. महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच १२७ व्या घटनादुरुतीचे पाऊल पडले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
धोका वाढला! मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी; लसचे दोन्ही डोस घेऊनही.
‘महाराष्ट्रातील मराठा समाज हा आज अनेक भागांत आर्थिकदृष्ट्या मागास ठरत आहे. शेतीचे अर्थकारण बिघडल्याचा हा परिणाम आहे. पुन्हा गुणवत्तेची पिछेहाट करणारी अनेक कारणे निर्माण झाली. अशा परिस्थितीत गतवैभवाच्या खाणाखुणांची पर्वा न करता मराठा समाजाला त्यांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरावे लागले. त्यादृष्टीने मराठा क्रांती आंदोलन यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. सर्वच पक्षांतील मराठा, ओबीसी नेते या आंदोलनात उतरले, पण भारतीय जनता पक्षातील मराठा नेत्यांनी तर ठाकरे सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काय तर म्हणे, ठाकरे सरकारमुळेच मराठय़ांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात पराभूत झाले. हे लोक अज्ञानी आहेत,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.
मन सून्न करणारी बातमी; करोनाने ‘या’ तीन जिल्ह्यांत दीड हजार मुलं पोरकी!