शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरात सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २२ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. अद्यापही प्रवेश संथ गतीने सुरू असल्यामुळे ही मुदतवाढ दिली असून, नाशिक जिल्ह्यात अद्यापही १ हजार ८३१ जागा शिल्लक आहेत. तसेच राज्यभरातही ३६ हजारांपेक्षा अधिक जागा शिल्लक आहेत. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्यभरात गेल्या महिनाभरापासून आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, या प्रवेशांना मिळणारा प्रतिसाद संथ असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन वेळा मुदवाढ देऊनही अद्यापही राज्यभरात ३६ हजारांवर जागा रिक्त आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ८५४ जागांपैकी केवळ ३ हजार २३ जागांवरी प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ८३१ जागा शिल्लक आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण करण्याची सूचना निवड यादीतील पालकांना देण्यात आली होती. परंतु, त्यानंतर १५ पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा या प्रक्रियेला एक आठवडा मुदतवाढ मिळाली आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असून, प्रवेश पडताळणी समितीमार्फत या त्रुटी दूर करण्यासाठी पालकांना मुत देण्यात आली आहे. अशा पालकांना २२ मे पर्यंत त्रुटी दर करून कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी सूचना राज्याचे अतिरिक्त सचिव संतोष गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला दिली आहे. आधी तांत्रिक अडचणी, सर्व्हरवर येणारा लोड यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. त्यानंतर आता कागदपत्रांमधील त्रुटींमुळेही प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया संपण्यास जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.