बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयात ३९४ उत्तरपत्रिकेत अक्षरबदलाचा प्रकार घडल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. या प्रकरणी कस्टोडियन, उत्तरपत्रिका तपासणीकांसह केंद्रप्रमुखांची सुनावणी झाली. यानंतर संबंधित नियामकांची सुनावणी होणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च दरम्यान झालेल्या बारावी दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांची सुनावणी सुरु आहे. परीक्षा कालावधीतील व परीक्षेतर कालावधीतील गैरप्रकार असे दोन प्रकार असतात. त्यात परीक्षेतर कालावधीतील गैरप्रकारांची सुनावणी सुरू आहे. यामध्ये उत्तरपत्रिकेत उत्तरांशिवाय इतर कोणता मजकूर लिहिला तर, तो आक्षेपार्ह समजला जातो.
३९४ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत थेट अपूर्ण असलेली उत्तरे पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षरबदलाचा हा प्रकारानंतर शिक्षण मंडळाने प्रकरणी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतली. त्यानंतर कस्टोडियन, तपासणीक, केंद्रप्रमुखांची सुनावणी झाली. केंद्रप्रमुखांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांचे म्हणणे ही सादर केले.
त्यानंतर आता नियामकांची ही सुनावणी होणार आहे. सोमवारी केंद्रप्रमुखांची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली.
दोन तालुके, ३९४ उत्तरपत्रिका
प्रकरणात विज्ञान विषयातील भौतिकशास्त्र विषयातील विद्यार्थी आहेत. उत्तरपत्रिकेतील बदल कोणी केले, हे सुनावणीतून शिक्षण मंडळ जाणून घेत आहे. विद्यार्थ्यांनी सुनावणी दरम्यान आपल्याला हा प्रकार मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यासह तपासणीक, परीक्षा केंद्रप्रमुखांची सुनावणी घेतली.
३९४ उत्तरपत्रिका या अंबाजोगाई आणि कळमनुरी तालुक्यातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या आहेत. त्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी जिल्ह्यातील तपासणीकांकडे आल्या होत्या. दोन तपासणीकांकडे तपासणीसाठी आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
उत्तरपत्रिकांचा प्रवास…
परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा प्रवास कसा झाला. त्यानुसार प्रकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न मंडळ करीत असल्याचे सांगण्यात येते. विषयाचे पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्रावरून उत्तरपत्रिका कस्टडीत जातात. तेथून तपासणीसाठी उत्तरपत्रिका शाळा, महाविद्यालयातील तपासणीकांकडे जातात. ज्या जिल्ह्यात परीक्षा झाली त्या जिल्ह्यातील पेपर दुसऱ्या जिल्ह्यात तपासणीसाठी पाठवले जातात. तपासणीकांकडून उत्तरपत्रिका नियामकांकडे जमा केल्या जातात व नियामक मंडळाला सादर करतात. आक्षेपार्ह लेखन आढळून आलेल्या ३९४ उत्तरपत्रिका अंबाजोगाई व कळमनुरी तालुक्यातील आहेत.