विद्यार्थ्यांच्या संख्येवर शाळेतील शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. शिक्षण विभागाकडून सरल प्रणालीत आधार जोडणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान करोनाच्या पार्श्वभुमीवर २०१९-२०नंतर शाळांच्या संच मान्यता बदलण्यात आल्या नाहीत.
करोनानंतर अनेक भागातील विद्यार्थी स्थलांतर झाले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या संख्येत बदल झाला आहे. परिणामी प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी ‘आधार वैध’ विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांची आधारसह माहिती सरल प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. काहींच्या आधार कार्डातील माहिती विसंगत असून काहींचे आधार कार्ड काढताना तांत्रिक अडचणींशी सामना करावा लागत आहे.
आधार जोडणीतील या विविध अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीवर नोंदविण्यात आली नाही. परिणामी संचमान्यतेसाठी शिक्षण विभागाने वांरवार मुदत देऊनही अद्यापही मोठ्या संख्येने आधार जोडणीचे काम शिल्लक आहे.
मुंबईत विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून एकूण ४६ लाख ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्यातील केवळ ३३ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांचेच आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. शिक्षण विभागाने संचमान्यतेसाठी आधार जोडणीकरिता १५ मेची अंतिम मुदत दिली होती. मात्र या मुदतीनंतरही मुंबई विभागातील सुमारे १३ लाख २१ हजार विद्यार्थ्यांची आधार जोडणी झाली नसल्याचे चित्र आहे. त्यातून मुंबई विभागातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भिती शिक्षणक्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर होणार आहे.
सरल प्रणालीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरच संचमान्यता निश्चित होणार आहे. त्यातून शिक्षक अतिरिक्त ठरण्याबरोबरच भरती प्रक्रियेत शाळांना कमी पदे मंजूर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुंबई विभागात विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे सर्वाधिक काम मुंबई उत्तर विभागात झाले आहे. मुंबईतील पालिकेच्या शाळांव्यतिरिक्त अन्य शाळांतील ७४.३७ टक्के विद्यार्थ्यांची सरल प्रणालीत आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. पालघरमधील ७५.५७ टक्के, रायगडमधील ७१.३७ टक्के, ठाणे ७०.५६ टक्के विद्यार्थ्यांची सरल प्रणालीत आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.
पालिकेच्या शाळा पिछाडीवर
मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील शाळांपैकी केवळ ६५.६६ टक्के विद्यार्थ्यांचे आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. पालिकेच्या अखत्यारीतील शाळांतील ६ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांची सरल प्रणालीत आधार जोडणी झाली आहे. त्यामुळे अद्याप २ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम शिल्लक आहे.