डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचा कार्यकाळ २८ मे रोजी पूर्ण होत आहे. यामुळे नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या शोध समितीकडे उपलब्ध अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. कुलगुरूपदासाठी इच्छुकांचे जवळपास ३५ ते ४० अर्ज या समितीकडे आले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे निवडीबाबत तांत्रिक प्रक्रिया सुरू असली, तरी २८ मेनंतर लगेचच कोकण कृषी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता कमी आहे.
कुलगुरूपदाच्या निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. पी. एन. साहू समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.
मार्चमध्ये नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या कुलगुरू शोध समितीकडून प्राप्त अर्जांपैकी छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. त्यानंतर योग्य पाच उमेदवारांची निवड केली जाईल. या पाच नावांची शिफारस असलेला लिफाफा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. राज्यपाल संबंधित पाच जणांची मुलाखत घेऊन कुलगुरूपदाच्या नावावर अंतिम शिक्कमोर्तब करतील. या सगळ्या प्रक्रियेला अजून मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
२८ मे रोजी काहींचा मुलाखती
‘प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असताना पदवी ग्राह्यतेबाबत आवश्यक असल्यास माहितीही मागवावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेला काही कालावधी जातो,’ असे शोध समितीचे समन्वयक डॉ. पी. एन. साहू यांनी स्पष्ट केले. छाननी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी २८ मे रोजी काही इच्छुक उमेदवारांना कुलगुरू निवड समितीने मुलाखतीसाठी बोलावले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.