राज्याच्या शिक्षण विभागामार्फत नुकतीच २० मेपर्यंत संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही त्रुटींमुळे हजारो विद्यार्थ्यांची आधारकार्ड जोडणी बाकी असल्याने, दिलेल्या मुदतीत विद्यार्थीसंख्या मूळ पटापेक्षा कमी नोंदविली जाणार आहे.
परिणामी, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती असून, आधार जोडणीसाठी मुदतवाढीची मागणी होत आहे. शाळांमार्फत पटसंख्येचा केला जाणारा फुगवटा टाळण्यासाठी राज्य सरकारमार्फत यू-डायस प्लसवर प्रत्येक विद्यार्थ्याची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली होती.
ज्या विद्यार्थ्यांची आधार जोडणी झाली आहे, त्यांनाच ग्राह्य धरून त्यानुसार संचमान्यता केली जाणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले होते. परंतु, आधार जोडणीमध्ये शाळांना अनेक अडचणी येत आहेत. आधार कार्डवरील नाव, जन्मतारखेसह अन्य माहिती व विद्यार्थ्यांची शाळेमार्फत यू-डायस प्लसवर नोंदविलेली माहिती जुळत नसल्यामुळे, हजारो विद्यार्थ्यांची जोडणी अद्यापही बाकी आहे.
परंतु, विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी शाळांना १५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २० मेपर्यंत संचमान्यतेचे वाटप शाळांना केले जाणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. ज्यांची आधार कार्ड जोडणी झाली आहे, त्या विद्यार्थ्यांचेच प्रवेश ग्राह्य धरले जाणार असल्यामुळे, आधार जोडणीआभावी अनेक विद्यार्थी ग्राह्य न धरले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गुणोत्तरानुसार राज्यभरातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत संचमान्यतेची प्रक्रिया राबविली जाते. परंतु, करोनामुळे गेल्या दोन वर्षांत ही प्रक्रिया राबविण्यात शिक्षण विभागाला अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतर यंदाही या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.