हायलाइट्स:
- म्हैसाळ पाणी उपसा योजनेचा होणार विस्तार
- ‘या’ तालुक्याला मिळणार ६ टीएमसी पाणी
- दुष्काळी भागाला कृष्णा नदीतून पाणी देण्याचा तोडगा
सांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ६५ गावांसाठी सहा टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी कृष्णा नदीवरील मैसाळ पाणी उपसा योजनेचे विस्तारीकरण केले जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या जत तालुक्यातील ६५ गावांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या ६५ गावांना नेहमीच भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कर्नाटकातून पाणी मिळावे अशी मागणी जत तालुक्यातील लोकांकडून सुरू होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दुष्काळी भागाला कृष्णा नदीतून पाणी देण्याचा तोडगा काढला आहे.
वारणा धरणातील सहा टीएमसी पाणी जत तालुक्यासाठी राखीव ठेवून ते म्हैसाळ पाणी उपसा योजनेद्वारे देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. सध्या म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी पोहोचवले जाते. याच योजनेचे विस्तारीकरण करून आणखी ६५ गावांना पाणी दिले जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतुदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास देण्यात आले आहे.
याबाबत मंत्री पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी होती. त्याअनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. जत तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.