Scholarship: शाळा सुरू होताच शिष्यवृत्ती अर्जभरणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे. आवश्यक गुण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देता येत नाही. या पार्श्वभूमीवर निकालात आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

राज्य परीक्षा परिषद, माध्यमिक शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी नऊ ते दहा लाख विद्यार्थी देतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत बहुतांश जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत शाळांचा निकाल वाढवण्यासाठी विद्यार्थी निश्चित करून त्यांचे अर्ज भरणे, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, त्यासाठी शाळांनी नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच एक जुलैपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थीसंख्या निश्चित करता येईल. त्यानंतर परीक्षेची पूर्वतयारी करून घेता येणे शक्य होण्याचा विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होताच मुख्याध्यापकांची सभा घेऊन विद्यार्थी निवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन, अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याबाबत आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesscholarshipScholarship applicationschool educationSchool Scholarshipschool studentsशिष्यवृत्ती अर्जभरणा
Comments (0)
Add Comment