सायरस पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लसीकरण, लॉकडाऊन व सरकारी धोरण अशा सर्वच मुद्द्यावर सायरस पूनावाला यांनी रोखठोक मतं मांडली. ‘कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे नसून तिसरा डोसही गरजेचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बूस्टर डोसनतर पुन्हा लस घ्यायला लागू शकते,’ असं ते म्हणाले. ‘लसीचा दुसरा डोस दोन ते तीन महिन्याच्या आत घेणं योग्य आहे. लस उपलब्ध नसल्यामुळं सरकारनं ८४ दिवसांची अट घातली. कॉकटेल लसीचा पर्याय देखील योग्य नाही. त्याचे दुष्परिणाम आल्यास कोणाला जबाबदार धरणार,’ असा सवाल त्यांनी केला. करोनाची तिसरी लाट तीव्र नसेल, असं वाटतं. सामुदायिक रोग प्रतिकार शक्ती आणि लसीचं संरक्षण असल्यानं लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाउन लावूच नये!
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी उपाय असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. तसे निर्णयही घेतले जात आहेत. मात्र, लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाउन लावूच नये,’ असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. ‘करोना मृत्युदर खूपच कमी आहे. मृत्यू वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी दिला.
केंद्र सरकारवर ताशेरे
‘केंद्र सरकारनं लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. बाकीच्या देशातील नागरिकांना देखील लसीची गरज आहे. आम्ही आजवर अनेक देशांना लस पुरवत आलो आहोत. त्यांच्याकडून अॅडव्हान्स पैसेही घेतले आहेत. मात्र, त्यांना लस पुरवता येत नाहीए,’ असं पूनावाला म्हणाले. लसीकरण पूर्ण करण्याच्या टार्गेटवरून त्यांनी नेत्यांना लक्ष्य केलं. ‘राजकीय लोक थापा मारत आहेत. त्यांनी सांगितलेल्या मुदतीत लसीकरण शक्य नाही,’ असं परखड मत त्यांनी मांडलं. ‘पुण्यात करोनाचे रुग्ण अधिक आहेत. त्यामुळं पुण्यात लस अधिक देण्यात यावी, असं आम्ही केंद्र सरकारला लिहिलं होतं. आमची पुरवठा करण्याची तयारी देखील होती. मात्र, मोदी सरकारनं अद्याप उत्तर दिलेलं नाही,’ असं ते म्हणाले.