‘तांत्रिक विसंगतींमुळे सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांची आधारजोडणी झालेली नाही. तसेच त्यातून यंदा सुमारे १५ ते २० हजार शिक्षकांची संख्या कमी होईल. अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आधार जोडणीअभावी ग्राह्य धरले जात नाही. त्यातून शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने अकरावी प्रवेशावेळीच आधारची नोंदणी केल्यास नंतर जोडणीची आवश्यकता भासणार नाही,’ असे मत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जाचा भाग भरण्याचा सराव करता यावा, यासाठी डेमो नोंदणीला २० मेपासून सुरुवात केली जाणार आहे. तर, २४ मेपर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर २५ मेपासून संकेतस्थळावर प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात होईल. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील.
तसेच, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच मार्गदर्शन केंद्रावरून ते तपासून प्रमाणित करून देण्याचे कामही सुरू होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दोन दिवस अर्जतपासणीचे काम सुरू राहील.
पहिली फेरी पार पडल्यानंतर प्रत्येकी सात ते नऊ दिवसांच्या फरकाने आणखी दोन फेऱ्या पार पडतील. तसेच, दोन विशेष फेऱ्यांसाठी प्रत्येकी सात दिवसांचा कालावधी दिला जाईल.
दरम्यान, प्रत्येक फेरीसोबतच समांतर कोट्यांतर्गत प्रवेशप्रक्रियाही राबविली जाणार आहे. ती पूर्ण करून ऑगस्टअखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. यातील पहिल्या विशेष फेरीनंतर लागलीच ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत.